ठाणे - भिवंडी शहरात धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाऊंडमधील तीन मजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळून आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढण्याचे काम बचाव पथक करीत आहेत. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा भिवंडीतील 782 धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून सुमारे 25 हजार कुटुंबांच्या म्हणजे सुमारे एक लाख नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, 782 धोकादायक इमारतींपैकी 210 इमारत अतिधोकादायक असून आज दुर्घटना घडलेली जिलानी इमारत त्यामधीलच आहे.
मागील तीन वर्षांंत भिवंडीत विविध ठिकाणी झालेल्या इमारत दुर्घटनेत कालपर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 42 जण जखमी झाले होते. त्यामुळे शासनाने दखल घेऊन अनधिकृत धोकादायक इमारती तोडून टाकण्याचा निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र पालिका प्रशासनाने कारवाई झाल्याचे कागदावरच दाखवून इमारतींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भिवंडी-निजामपूर शहरात महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील धोकादायक इमारतींची संख्या वाढतच आहे. यातील 43 इमारती तोडण्याची कारवाई हाती घेण्यात येणार असल्याचे, पालिका प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. पण ती कारवाई करण्यात आलीच नाही. तशात महापालिका केवळ धोकादायक इमारती रिकाम्या करा, अशा नोटिसा देऊन त्यांचे पुनर्वसन न करता आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.
आता कोरोनाच्या प्रादुर्भावात आपले कुटुंब कुठे घेऊन जायचे आणि कुठे रहायचे हा प्रश्न यातील इमारतीत राहणाऱ्या कुटुंबप्रमुखासमोर आहे. भिवंडी शहरांमध्ये यंत्रमाग उद्योग असल्याने या शहरात मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग राहतो. दिवसभर काम करून आपल्या कुटुंबाचे पोट भरून उरलेल्या पैशांची बचत करत तसेच कर्ज घेऊन अथवा दागिने गहाण ठेवून ते एखादे जुने घर घेऊन राहतात. नवीन घर घेणे शक्य नसल्याने, जुनी घरे कामगारांना नाईलाजाने घ्यावी लागतात. यामुळे धोकादायक इमारतींमध्ये कामगारांचे वास्तव्य वाढले आहे.
हेही वाचा - Live : भिंवडीत ३ मजली इमारत कोसळली; ५ बालकांसह १० जणांचा मृत्यू, गुन्हा दाखल
हेही वाचा -'ती' इमारत धोकादायक होती, पालिकेच्या नोटीसीकडे रहिवाशांचे दुर्लक्ष