ठाणे- साडे सात वर्षाच्या चिमुरडीला जबरदस्तीने जंगलात नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने अंबरनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्याच परिसरात राहणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आशुतोष चौबे (33) असे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या नराधमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी साडे सात वर्षीय चिमुरडी दुपारच्या सुमारास घरात एकटीच होती. हीच संधी साधून नराधम आशुतोषने तिला तुझे वडील बोलावत आहे असा बहाणा करून तिला घराबाहेर बोलावले. पीडित चिमुरडी घराबाहेर येताच या नराधमाने तिला जबरदस्तीने कडेवर घेत, तिचे तोंड हाताने दाबून तिला काही अंतरावर असलेल्या जंगल भागात नेले. त्या ठिकाणी या नराधमाने पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली त्यामुळे भयभीत झालेल्या मुलीने या नराधमाला विरोध केला. मात्र, या नराधमाने तिच्या तोंडावर जोरदार ठोसे बुक्क्यांनी मारहाण करून तिचा एक दात पडला. जखमी अवस्थेत असलेली चिमुरडी यामुळे आणखी भयभीत झाली, अशातच या नराधमाने तिच्यावर अमानुष बलात्कार केला आणि तो घटनास्थळावरून पसार झाला.
दरम्यान, चिमुरडीने रडतच घर गाठल्यावर घडलेला प्रकार आईला सांगितला हे ऐकून आईला धक्काच बसला. त्यानंतर तिच्या आईने अंबरनाथ पोलीस स्टेशन गाठून नराधम आशुतोष चौबे विरोधात गुन्हा दाखल केला. अंबरनाथ पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून या नराधमाला काही तासातच अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश करे करत आहेत.