ठाणे - भिवंडी शहरातील कणेरी परिसरातील एका 62 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर पॉझिटिव्ह रुग्ण हे डायबिटीस आणि प्लुरल इन्फुजन या रोगाने बाधित होते.
त्यांना आधी डी वाय पाटील हॉस्पिटल नवी मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात होते. तिथून ते अपना हॉस्पिटल भिवंडी व त्यानंतर लाईफ लाईन हॉस्पिटल भिवंडी येथे अॅडमिट होते. लाईफ लाईन हॉस्पिटल येथे उपचार घेत असतांना ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना भिवंडीतील आई जी एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना जे जे हॉस्पिटल मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. येथूनही त्यांना जीटी हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. मात्र, या ठिकाणी उपचार सुरु असतांना त्यांचा 30 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. मात्र, याबाबत रविवारी भिवंडी मनपास मेलद्वारे माहिती मिळाली असल्याचा निर्वाळा भिवंडी मनपाने रविवारी सायंकाळी उशिराने दिला आहे.
सध्या भिवंडी शहरात एकूण 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, तीन रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, 21 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे.