ठाणे - कल्याण-डोंबिवलीत मागील २४ तासात कोरोनाचे ५७ नवे रुग्ण आढळले. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ६९९ वर जाऊन पोहोचला असून आत्तापर्यंत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत २५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर ४२६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये ९ अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे. यात १० महिन्याच्या बालकापासून १४ वर्ष वयोगटातील मुले-मुली आहेत. शुक्रवारी डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली गावात राहणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बाधित रुग्णामध्ये सर्वाधिक रूग्ण कल्याण पूर्व भागातील आहेत तर कल्याण पश्चिम परिसरात सर्वांत कमी रूग्ण आहेत. आत्तापर्यंत मांडा टिटवाळा, अंबिवाली, मोहने या ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.