ठाणे- भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज शहरात एकाच दिवसात कोरोनाचे 38 नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात 14 नवे रुग्ण आढळले आहेत. आज ग्रामीण व शहरात एकूण 52 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
भिवंडी शहरात आतापर्यंत 470 कोरोनाबधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 180 रुग्ण बरे झाले आहेत. तर 21 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 269 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत 248 रुग्ण आढळले असून त्यापैकी 98 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून 146 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान आज आढळलेल्या 52 नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 718 वर पोहोचला असून त्यापैकी 278 रुग्ण बरे झाले आहेत तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला असून 415 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
भिवंडीत 350 बेडच्या कोविड रुग्णालयाला मान्यता
भिवंडी शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे येथील एकमेव कोविड रुग्णालय असलेल्या स्व इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयावर प्रचंड ताण येत आहे. त्यातच शहरात दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने या रुग्णांवर उपचार करण्यास मनपा प्रशासनाला अनेक अडचणी येत आहेत. त्यातच उपचारा अभावी अनेक रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
या सर्व बाबींची दखल घेत भिवंडीच्या महापौर प्रतिभा पाटील यांनी भिवंडीत नव्या कोविड रुग्णालयाची मान्यता मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. भिवंडीची कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरात 350 बेडच्या कोविड रुग्णालयाला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे.
भिवंडी शहरातील पोगाव येथे मनपाच्या अखत्यारीत असलेल्या 40 हजार चौरस फुटाच्या गोदामामध्ये या नव्या 350 बेडच्या कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे सभागृह नेते विलास पाटील यांनी दिली आहे. या नव्या कोविड रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील डॉक्टर तसेच नर्स यांनी पुढे येऊन महापालिकेस व रुग्णांना सहकार्य करावे, अशी विनंती मनपाच्या महापौर प्रतिभा पाटील यांनी केली आहे.