ठाणे - महानगरपालिकेच्यावतीने पाणीबिलाची चालू रक्कम थकीत पाणीबिलाच्या रकमेसह फेब्रुवारी अखेरपर्यंत भरल्यास नागरिकांना दंडाच्या आणि व्याजाच्या रकमेमध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली पाणी बिलाची रक्कम भरून या विशेष सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या नळसंयोजन धारकांनी अद्यापपर्यंत पाण्याच्या बिलाचा भरणा केलेला नाही, अशांचे नळसंयोजन खंडीत करण्याची कडक कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पाणी बिलांवर आकारलेल्या दंड आणि व्याजमध्ये सूट दिल्यास पाणी बिल भरणा सुलभ होईल, अशी मागणी नळसंयोजन धारकांकडून सातत्याने होत होती, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेतंर्गत जे नळसंयोजनधारक देय असलेल्या पाणीबिलाची रक्कम थकीत रकमेसह 29 फेब्रुवारीपर्यंत एक रकमी भरतील अशा नळसंयोजनधारकांना त्यांच्या पाणी बिल आकारावरील दंड आणि व्याजाच्या रकमेमध्ये 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच जे नळसंयोजनधारक 1 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत पाणीबिलाची पूर्ण रक्कम एकरक्कमी भरतील त्यांच्या पाणीबिल आकारावरील दंड आणि व्याजाच्या रक्कमेत 40 टक्के सूट देण्यात येणार आहे.
दरम्यान, नागरिकांना पाणीबिलाची रक्कम भरणे सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व चौथा शनिवार व सर्व रविवारी ही कार्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने पाणीबिल भरता येणार आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या Digi Thane या अॅपव्दारे सुध्दा मालमत्ता कराची रक्कम भरल्यास विशेष सवलत मिळू शकेल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.