ठाणे - जिल्ह्यातील वाघबीळ, कासारवडवली, भाईंदर पाडा, मोघरपाडा आणि ओवळा भागातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. गेल्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार भूमिपुत्रांवर आलेल्या संकटाच्या वेळी ५ वर्ष गावात फिरकले नाहीत. त्याचा निषेध करीत गावात प्रचार फेरी नव्हे तर पोलिंग बूथही लावू न देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
भूमिपुत्रांच्या गावांवर क्लस्टर योजना, वॉटर डिसेलिनेशनचे आरक्षण, वॉटर फ्रंट प्रकल्प, मेट्रो कारशेडचे आरक्षण, मेट्रो कास्टींग यार्डचे आरक्षण, कांदळवनाची शेतीमध्ये लागवड, जबरदस्तीने होणारे अधिग्रहण, मोबदला न देता सुरू असलेले अधिग्रहण, भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाई असे अनेक संकटे आली असताना लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान खासदारांनी लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी भूमिपुत्रांशी संवाद साधणे अपेक्षित होते. मात्र, दुर्दैवाने तसे झाले नाही. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील ग्रामस्थ अनेक वर्ष प्रॉपर्टी कार्ड मिळावण्यासाठी लढा देत आहेत. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मिळत नाही.
नवी मुंबईतील जमिनी १९७० च्या आसपास अधिग्रहीत केल्या गेल्या. त्यानंतर भूमिपुत्र आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून त्यांच्यासोबत असल्याचा संदेश देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ठाण्याचा विकास होत असल्याचे चित्र दिसत असले तरी गावांना संपवण्याचा विडा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी उचलला आहे. वाघबीळ गावामधून प्रचार फेरी नव्हे तर पोलिंग बूथसुध्दा लावू दिला जाणार नसल्याची भूमिका वाघबीळच्या ग्रामस्थांनी घेतली आहे.