ठाणे : लुथफा बेगम जहाँगीर आलम (वय ४६ वर्षे, रा. बांगलादेश), जोरना जलालमियाँ अख्तार (वय २३), मासुमा जमीरउद्यीन (वय २०, रा. बांगलादेश) अल्पवयीन १५ वर्षीय मुलगी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर रघुनाथ उदय मंडल असे आश्रय देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्यालाही अटक केली आहे.
पोलीस पथकाकडून बांगलादेशींचा शोध : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन, पश्चिम परिसरात काही बांगलादेशी महिला संशयास्पदरित्या वावरत असल्याबाबत पोलीस अधिकारी प्रतिभा माळी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. या बातमीची खातरजमा करण्यासाठी वपोनि. अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रदीप पाटील, प्रतिभा माळींसह पोलीस पथकाने स्टेशन परिसरात बांगलादेशी महिलांचा शोध सुरू केला. या दरम्यान सायंकाळच्या सुमारास एसटी डेपो, रिक्षा स्टॅन्ड परिसरात ५ महिला, १ पुरुष हे संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आले. त्यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेऊन महिलांकडे पोलीस पथकाने चौकशी केली. पण त्यांना हिंदी, मराठी अशी कोणतीच भाषा समजत नसल्याने त्या बोलत नव्हत्या.
पोलीस तपासात माहिती उघड : यानंतर त्यांच्याकडे भारताचे नागरीक असल्याबाबतच्या पुराव्याविषयी विचारणा केली असता ५ महिलांपैकी ३ मोठ्या महिला व एक अल्पवयीन मुलगी या बांगलादेशी नागरीक असल्याचे तसेच एक महिला व तिच्यासोबत असलेली व्यक्ती हे पती-पत्नी असल्याचे समोर आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेला रघुनाथ उदय मंडल व त्याची पत्नी रितीका रघुनाथ मंडल यांनी मोठ्या महिला व एक अल्पवयीन मुलगी ह्या बांगलादेशी नागरिकांना आश्रय दिल्याचे समोर आले. त्यामुळे बांगलादेशी महिला नागरीक व त्यांना आश्रय देणारा भारतीय नागरीक यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
रितीका देखील बांगलादेशी नागरीक : पोलीस तपासात आरोपी रघुनाथ उदय मंडल व त्याची पत्नी रितीका हे डोंबिवली पूर्वेकडील आजदेगावात वास्तव्य करीत असल्याचे उघड झाले. खळबळजनक बाब म्हणजे रितीका ही देखील बांगलादेशी नागरीक असल्याचेही समोर आले. ती सुमारे ५ वर्षांपूर्वी भारतात आल्याचे व तिचे खरे नाव आखी अयुबअली अख्तार असे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बांगलादेशी महिला आखी अयुबअली अख्तार हिचे रितीका रघुनाथ मंडल या नावाने आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात इतरही कलमे वाढविण्यात आली आहेत. महिला भारतात कोणत्या कारणासाठी आल्या? कशा आल्या? त्यांना भारतात येण्याकरिता कोणी मदत केली? त्यांच्यासोबत आणखी बांगलादेशी नागरीक आले आहेत काय? याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख हे पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा: