ठाणे - तीन हात नाका परिसरात लखानी कन्स्ट्रक्शन साईटवर काम सुरू आहे. येथील ३७ मजूर कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. ठाणे महापालिकेने केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये हे मजूर पॉझिटिव्ह निघाले असून त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने भाईंदर पाडा येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, ही कंस्ट्रक्शन साईट बंद करण्यात आली असून पालिकेच्या शहर विकास विभागालादेखील पत्र देखील देण्यात आले आहे, अशी माहिती नौपाडा-कोपरी विभागाच्या सहाय्यक प्रणाली घोंगे यांनी ही माहिती दिली आहे.
तीन हात नाका परिसरात लखानी बिल्डर्सच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शनचे मोठे काम सुरू असून या कंस्ट्रक्शन साईटवर मोठ्या प्रमाणात बांधकाम मजूर काम करत आहेत. शनिवारी या साईटवर एक ते दोन मजूर कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून याठिकाणी रविवारी अँटीजेन टेस्टसाठी कॅम्प लावण्यात आल्यानंतर या कॅम्पमध्ये ८२ पेक्षा अधिक मजुरांनी चाचणी केली. यामध्ये ३७ मजूर कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत, तर उर्वरित मजुरांची चाचणी ही निगेटिव्ह निघाली आहे. पॉझिटिव्ह निघालेल्या मजुरांना कुठलीही लक्षणे नाही. तसेच जे निगेटिव्ह आले आहेत, त्यांचीदेखील नियमित चाचणी केली जाणार आहे. तसेच या सर्वांना भाईंदर पाडा येथे ठेवण्यात आले असून साईट बंद करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी सांगितले.
ठाणे महापालिका हद्दीत अँटीजेन चाचणीला सुरुवात करण्यात आली असून जवळपास १ लाख अँटीजन किट्सच्या माध्यमातून ९ प्रभाग समितीमध्ये ही चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे ९ प्रभाग समितीमध्ये अनेक ठिकाणी या चाचणीसाठी सेंटर्स निर्माण करण्यात आले असून नागरीकांना या सेंटर्सच्या माध्यमातून मोफत कोरोनाची मोफत चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.