ठाणे- मनीला येथून क्वॉलालाम्पूर मार्गे मुंबईत येण्यास निघालेल्या सुमारे ३०-३२ विद्यार्थ्यांना भारतात आणण्यास एअर इंडियाच्या विमानाने नकार दिला आहे. हे विद्यार्थी काल मलेशियात पोहोचले होते. त्यांना मलेशियन एअरलाईन्सने आज सकाळी सिंगापूरला नेले होते.
सिंगापूरला पोहोचताच विद्यार्थ्यांना लगेच एअर इंडियाच्या मुंबईकडे येणाऱ्या विमानाचे तिकीट देण्यात आले. परंतु, आज दुपारी सिंगापूरहून एयर इंडियाच्या विमानाचे बोर्डिंग पास मिळतेवेळी मलेशियातून येणाऱ्या लोकांना भारतात प्रवेश न देण्याचे आदेश आल्याचे सांगण्यात आले. तसेच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच सिंगापूर एअर लाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना भारतात नेण्यास नकार दर्शविला. त्यामुळे, सध्या हे विद्यार्थी सिंगापूर येथे कोणत्याही मदतीशिवाय अडकले आहेत.
विद्यार्थी फिलिपाईन्सहून निघाल्यानंतर सरकारने विमान उड्डाणाचे नियम बदलल्यामुळे कोणतीही माहिती व चूक नसताना विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी भारत सरकारने याप्रकरणात लवकरात लवकर लक्ष घालून सर्व भारतीयांना देशात आणण्याची योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. सिंगापूरमध्ये अडकलेले हे सर्व विद्यार्थी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर भागातील आहेत. त्यामुळे, सरकारने लागलीच या अडचणीतून त्यांची सुटका करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांचे नातेवाईक करत आहेत.
हेही वाचा- कोरोना इफेक्ट : ठाणे पोलीस आयुक्तालयात गर्दी करू नका, पोलीस आयुक्तांचे नागरिकांना आवाहन