ठाणे - कल्याण-डोंबिवली शहरात या आठवड्याभरात अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे शेती आणि जंगलातील विषारी -बिन विषारी सापांच्या बिळात पाणी शिरल्याने सापांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. त्यातच एकाच दिवशी एक विषारी आणि दोन बिन विषारी भल्यामोठय़ा सापांना सर्पमित्रांनी पकडल्याच्या घटना घडल्या आहेत.
डोंबिवलीतील एका मॉलमध्ये 6 फुटाचा साप आढळून आल्याने ग्राहकांची पळापळ झाली. दुसऱ्या घरात कोब्रा नाग घुसल्याने कुटुंबाचा थरकाप उडाला होता, तर तिसऱ्या घटनेत आधारवाडीच्या डंपिंग शेजारच्या इमारतीमध्ये 8 फुटाचा साप इमारतीमधील पाण्याच्या पाईपलाईनमध्ये घुसून बसला होता. विशेष म्हणजे गेल्या 3 दिवसांत सर्पमित्रांनी 22 विषारी आणि बिन विषारी साप मानवी वस्तीतुन पकडून जंगलात सोडल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे.
पहिल्या घटनेत डोंबिवलीतील मानपाडा रोडवर इंप्रेस मॉल आहे. दुपारच्या सुमारास या मॉलमध्ये काही ग्राहक खरेदी करण्यासाठी आले होते. त्यावेळी एका ग्राहकांला हा 6 फुटाचा लांबलचक साप दिसला. त्याने साप घुसल्याची माहिती इतर ग्राहकांना दिली. त्यामुळे मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला होता. मॉलमध्ये साप शिरल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची पळापळ झाली. यानंतर मॉलचे व्यवस्थपक मोहित तोमर यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता यानी घटनास्थळी येऊन काही मिनिटांत साप पकडून पिशवीत बंद केल्याने मॉलमधील कर्मचारी व ग्राहकांनी सुटकेचा निश्वास घेतला.
दुसऱ्या घटनेत कल्याण मुरबाड रोडवरील एका ऑटोमोबाईल शोरूम शेजारच्या घरात कोब्रा नाग शिरल्याचे पाहून घरातील कुटुंबाचा थरकाप उडाला. त्यांनी नाग पाहून घराबाहेर धूम ठोकली होती. यानंतर कुटुंबातील एका सदस्याने घटनेची माहिती सर्पमित्र दत्ता यांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घरातून कोब्रा पकडला. कोब्रा पकडल्याचे पाहून कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला.
तिसऱ्या घटनेत कल्याणच्या आधारवाडी परिसरात डंपिंग लगत महापालिकेच्या बीओटी तत्वावर सुरु असलेल्या इमारतीमध्ये पाण्याच्या पाईपलाईनमध्ये 8 फुटाची भलीमोठी धामण वेटोळे घालून बसललेली कामगारांना दिसली. त्यानी इमारतीमध्ये साप शिरल्याची माहिती सर्पमित्र बोंबे यांना दिली. माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. या सापाला पकडल्याने कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला. दरम्यान या तिन्ही सापांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली.