ठाणे - भिवंडीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बुधवारी ग्रामीण भागातील काल्हेर येथे कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळले आहे. यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 13 वर पोहोचला आहे. दिलासादायक म्हणजे ग्रामीण भागातील पडघा बोरिवली येथील महिला कोरोनामुक्त झाली असून ग्रामीण भागातील 12 जणांवर उपचार सुरू आहेत.
भिवंडी शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 19 वर पोहोचला आहे, तर शहरातील 2 रुग्ण बरे झाल्याने आता बाधीत रुग्णांचा आकडा 17 आहे. त्यामुळे भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण २९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे.
भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले रुग्णांपैकी एक 39 वर्षीय व दुसरे 57 वर्षीय पुरुष हे दोघे रुग्ण मुंबई महापालिकेतील कर्मचारी आहेत, तर एक रुग्ण 45 वर्षीय पुरुष असून ते ठाणे महापालिकेत (टिएमसीत) कंडक्टर म्हणून कार्यरत आहे. या तिघांचा कोरोना अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून त्यांच्या घरच्यांना भिवंडीतील क्वारंटाईन केंद्रात पाठविण्यात आले असल्याची माहिती खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. डावकर यांनी दिली आहे.