ठाणे - अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या चुलत भावावर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील नागांव परिसरात घडली होती. या गुन्ह्यात फरार झालेल्या हल्लेखोर त्रिकुटास शांतीनगर पोलिसांनी शिताफीने पिस्तुलासह राजस्थानच्या अजमेर येथून अटक केली आहे. अशफाक सिद्धीकी असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तर या गुन्ह्यात अफसर इर्शाद खान व सादिक जुबेर खान अशा अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भिवंडी शहरातील नागाव परिसरात नौशाद मुख्तार सिद्धीकी (वय 38 ) याच्या चुलत बहिणीसोबत आरोपी अशफाक सिद्धीकी यांचे अनैतिक प्रेमसंबंध असल्याचे नौशाद सिद्धीकी याला समजले. त्याने या अनैतिक संबंधास विरोध केला. शिवाय आरोपीच्या पत्नीचे दागिने स्वतः कडे ठेवले होते. याच रागातून मुख्य आरोपी अशफाक सिद्धीकी व त्याचे साथीदार अफसर इर्शाद खान व सादिक जुबेर खान या तिघांनी नौशाद सिद्धीकी याच्या घरासमोर येऊन त्याच्याशी वाद घातला. तसेच अशफाक यांने नौशादवर गोळीबार केला, यातून तो थोडक्यात बचावला होता. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुख्य आरोपीला अजमेरच्या एका हॉटेलमधून अटक
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीचा सर्वत्र शोध घेतला. मुख्य आरोपी अशफाक सिद्दीकी हा राजस्थानातल्या अजमेरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अजमेर गाठत त्याला एका हॉटेलमधून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.