ठाणे - जिल्ह्यात गुरुवारी 16 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 289 वर पोहोचली आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात आढळून आलेल्या नऊ रुग्णांमध्ये दोन पोलिसांचा समावेश असून हा आकडा 110 वर पोहोचला आहे. मिराभाईंदरमध्ये सापडलेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णामुळे तेथील रुग्णांची संख्या 50 झाली असून अशाप्रकारे 50 रुग्ण आढळणारी मिरा भाईंदर ही जिल्ह्यातील चौथी महापालिका ठरली आहे.
ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 289 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 110 झाली असून त्या पाठोपाठ कल्याण-डोंबिवली- 60, नवीमुंबई- 54 आणि मिराभाईंदर- 50, भिवंडी व उल्हासनगर येथे प्रत्येकी एक, अंबरनाथ-3, बदलापूर-4 आणि ठाणे ग्रामीण- 6 असे रुग्ण सापडले आहेत. गुरुवारी ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात पाच रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे. तसेच केडीएमसीमध्ये 3, नवीमुंबईत-2 आणि मिराभाईंदर व ठाणे ग्रामीण येथे प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे संशयित रुग्णांच्या तपासणी अहवालात म्हटले आहे. 13 एप्रिलला वाढलेल्या 56 रुग्णांनंतर रुग्णांची संख्या कमी होत असताना दिसत असल्याने ती सुखदायक गोष्ट आहे.