नवी मुंबई - शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. नवी मुंबईत दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यामुळे नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढत आहे. आज दिवसभरात नवी मुंबईत 23 रुग्णांची भर पडली असून, सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या 133 इतकी झाली आहे.
नवी मुंबईत आतापर्यंत 144 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यामध्ये 133 नागरिक नवी मुंबईत राहणारे आहेत. तर उर्वरित 11 हे इतर भागातील होते. आतापर्यंत नवी मुंबई शहरात 1953 नागरिकांची कोविड 19 चाचणी करण्यात आली होती. यामध्ये 1327 इतक्या नागरीकांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असून, 131 जण कोविड 19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 495 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तसेच 27 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
नवी मुंबईत आज एकाच कुटुंबातील 6 पुरुष व 3 महिला असे 9 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर बेलापूरमध्ये 9, नेरुळमध्ये 4, तुर्भेमध्ये 4, वाशीमध्ये 2, घणसोलीमध्ये 2, कोपरखैरणेमध्ये 2, असे 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 33 ठिकाण प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. पहिल्यांदाच एक दिवसात 20 च्या वर रुग्ण आढळले असून, ही बाब नवी मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकत आहे.