ठाणे - शेतात जात असताना एका 22 वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मुरबाड तालुक्यातील तळ्याची वाडी येथे घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून गावकऱ्यांच्या सतर्कमुळे त्याचे प्राण वाचले. अशोक हरी भरतड असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा - कुत्र्यांना घाबरून बिबट्या चढला झाडावर...पाहा हा चित्तथरारक व्हिडिओ !
बदलापूर नजीक असलेल्या बारवी धरणामुळे मुरबाड तालुक्यातील तळ्याची वाडी आणि लगतच्या परीसरात घनदाट जंगल आहे. आज (1 डिसेंबर) सकाळी साडे नऊच्या सुमारास अशोक भरतड हा तरुण शेतात जात असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. यात त्याच्या हाताला आणि पोटाला गंभीर जखमा झाल्या आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तिथून पळ काढला. बिबट्याच्या तावडीतून वेळीच सुटका झाल्यामुळे अशोकचा जीव वाचला.
दरम्यान, वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सध्या अशोकवर उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणाच्या उपचाराचा संपुर्ण खर्च वनखात्याकडून देण्यात येणार आहे. तसेच बिबट्या वावरत असलेल्या ठिकाणी वनखात्याचे कर्मचारी लक्ष ठेऊन असल्याची माहितीही वन अधिकाऱ्यांनी दिली.