ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या २४ तासात २२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, गेल्या २४ तासात १३० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने कल्याण डोंबिवलीकरांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३६६ झाली असून त्यापैकी २३१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात रहिवासी असलेले, मात्र मुंबई व ठाणे येथील अत्यावश्यक सेवेतील कोरोनाबाधितांची संख्या ही १४५ असून त्यांच्या निकट सहवासातील बाधितांची संख्या ही ७३ इतकी आहे. यामुळे मुंबईतून ये-जा करणाऱ्या रुग्ण कर्मचाऱ्यांची व त्यांच्या निकट सहवासातील बाधितांची एकूण संख्या २१८ च्या घरात पोहोचली आहे. आज आढळून आलेल्या २२ रुग्णांपैकी ८ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत, तर १४ रुग्ण कर्मचाऱ्यांच्या निकट सहवासातील आहेत. यामध्ये ५ महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. तर, आतापर्यत ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, डोंबिवली येथील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून ५ रुग्णांना, महापालिकेने कोव्हिड-१९ साठी सामंजस्याचा करार केलेल्या होली क्रॉस रुग्णालयातून २ रुग्णांना, निऑन रुग्णालयातील १४ रुग्णांना आणि टाटा आमंत्रा येथील ५ रुग्णांना सुट्टी मिळाली आहे. आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार १३ रुग्णांना रुग्णालयांमधून सुट्टी मिळाली होती. त्यामुळे, आज सुट्टी मिळालेल्या रुग्णाची संख्या ही १३० असून आजपर्यंत सुट्टी मिळालेल्या रुग्णांची ही सगळ्यात मोठी संख्या आहे. महापालिका क्षेत्रातील ३६६ रुग्णांपैकी एकूण १३० रुग्ण उपचारा अंती बरे झाले आहेत. निऑन रुग्णालयातून सुट्टी मिळालेल्या रुग्णांमध्ये २ डायलिसिस रुग्णांचा व एका गर्भवती महिलेचा समावेश होता.
हेही वाचा- ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील 'हे' विभाग अनिश्चीत कालासाठी पूर्णत: बंद