ठाणे - लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीला 20 लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीला ५ कोटी रुपयांची ऑफर देत २० लाख रुपये घेऊन गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात 3 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.
बतावणीला भुलले -
याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यासागर चव्हाण हे शहर विकास विभागात नोकरीला आहेत. मार्च महिन्यात चव्हाण हे जिल्हाधिकारी कार्यालयातील उपचार गृहात आपल्या मित्रांसोबत चर्चा करत होते. विद्यासागर चव्हाण यांनी आपल्या पत्नीला लोकसभा निवडणुकीत उभे करण्याबाबत वक्तव्य केले. त्याच दरम्यान बाजूला बसलेला आरोपी नचिकेत जाधव याने ही चर्चा ऐकली. त्यानंतर त्याने चव्हाण यांच्याशी संपर्क साधून निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मित्र अरविंद शर्मा याच्यासह चव्हाण यांना मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील भोंदूबाबा गुरुदेव महाराज यांच्याकडे नेले.
अनामत रक्कमही जप्त -
त्यावेळी भोंदूबाबा गुरुदेव याने फिर्यादी चव्हाण यांच्या पत्नीला लोकसभेत निवडून येण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याबदल्यात आरोपींनी चव्हाण यांच्याकडून ५ कोटी रुपयांची मागणी केली. त्यापैकी २० लाखाची रक्कम आरोपींनी दिली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यानंतर चव्हाण यांनी ठाणे लोकसभा मदतर संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. एप्रिल महिन्यात निवडणूकही पार पडली. त्यावेळी चव्हाण यांच्या पत्नीची अनामत रक्कमही जप्त झाली. त्यांना १ हजार १८८ मते मिळाली.
त्यामुळे संतापलेल्या चव्हाण यांनी आरोपींकडे आपले पैसे परत मागितले. त्यावेळी आरोपींनी चव्हाण यांना पुन्हा पैसे मागू नकोस, अन्यथा गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. त्यानंतर चव्हाण यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात नचिकेत जाधव (रा. घणसोली, नवी मुंबई) शर्मा (रा, चंदीगड) आणि गुरुदेव महाराज (रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.