ठाणे - भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंड येथील तीन माजली जिलानी इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी (दि. 21 सप्टें.) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली होती . या दुर्घटनेत 38 जणांचा बळी गेला असून 25 जण जखमी झाल्याचे अधिकृत आकडेवारी महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. मात्र, या दुर्घटनेत 20 चिमुरड्यांचा नाहक बळी गेल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे काही मृतांच्या नाव व आडनावावरून मृतांच्या आकडेवारीत बुधवारी (दि. 23 सप्टें.) सायंकाळी उशिरापर्यंत तफावत येत होती. बुधवारी सायंकाळी 41 मृतांची माहिती बचावकार्यासह महापालिका प्रशासनाकडून मिळत होती. मात्र, पोलीस प्रशासनाने मृतदेहांचा पंचनामा व इतर बाबी तपासल्यानंतर या दुर्घटनेत आतापर्यंत 38 जण मृत तर 25 जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या दुर्घटनेत दिड ते पंधरा वर्ष वयोगटातील एकूण 20 चिमुरड्यांचा नाहक बळी गेला आहे. कुणाचे एक, कुणाचे दोन तर कुणाची तीन तीन मुले या दुर्घटनेत मृत्युमुखी पडली आहेत . आपल्या चिमुरड्यांचे मृतदेह पाहून नातेवाईक हंबरडा फोडत होते.फातिमा बब्बू सिराज शेख (वय 2 वर्षे), फुजेफा जुबेर कुरेशी (वय 5 वर्षे), आक्सा मोहम्मद आबिद अंसारी (वय 14 वर्षे), मोहम्मद दानिश आदिल अंसारी (वय 11 वर्ष), फायजा जुबेर कुरेशी (वय 5 वर्ष), आयशा कुरेशी (वय 7 वर्षे), फातमा जुबेर कुरेशी (वय 8 वर्षे), अफसाना अंसारी (वय15 वर्षे), असद शाहिद खान (वय अडीच वर्षे), निदा आरिफ शेख (वय 8 वर्षे), शबनम मोहम्मद अली शेख (वय12 वर्षे), हसनैन आरिफ शेख (वय 3 वर्षे), आरीफा मुर्तुजा खान (वय 3 वर्षे), जैद जाबीर अली शेख (वय 5 वर्षे), जुनैद जबीरअली शेख (वय दिड वर्ष), मरियम शब्बीर कुरेशी (वय 12 वर्ष), फलकबानो मो.मुर्तुजा खान (वय 5 वर्षे), फराह मो. मुर्तुजा खान (वय 6 वर्षे), शबाना जाबीर अली शेख (वय 3 वर्षे), रिया खान (वय 3 वर्षे) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत.
धोकादायक ठरविलेल्या या इमारतीत अनेक कामगार व मजूर परिवार आपल्या परिवारासह राहत होती. पैशांची चणचण व कमी भाडे असल्याने या इमारतीत अनेक जण भाड्याने राहत होती. मात्र, हेच कमी भाडे आपल्या व आपल्या परिवाराची राख रांगोळी करेल असा विचार येथील रहिवासींना आला नाही हेच मोठे दुर्दैव ठरले आहे.
दरम्यान, चौथ्या दिवशी गुरुवारी (दि. 24 सप्टें.) सकाळी अकरा वाजता मृतदेहांची शोधमोहीम बचाव पथकाने थांबविली. त्यानंतर एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशामक दल, पोलीस, श्वान पथक व बचाव पथकातील इतरांनी या इमारतीतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तर या दुर्घटनेत एका अडीच वर्षांचा मुसीफ शब्बीर कुरेशी या मुलाचा मृतदेह अजूनही मिळाला नसल्याने मुलाचे वडील शब्बीर कुरेशी हे गुरुवारी चौथ्या दिवशी देखील आपल्या मुलाची वाट पाहत इमारतीच्या ढिगाऱ्याजवळ थांबले होते. तर या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांचे नातेवाईक आपल्या आप्त स्वकीयांची आठवण म्हणून या ढिगाऱ्यात काही मिळते का यासाठी शोधाशोध करत होते.
हेही वाचा - भिवंडी इमारत दुर्घटना : १० तास ढिगाऱ्याखाली अडकून डोळ्यांनी पाहिला मृत्यू, मात्र...