ठाणे : ठाण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यात 10 महिलांसह 18 बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याची प्राथमीक माहिती समोर आली होती. मात्र या कारवाईत दहा महिला आणि आठ पुरुषांना अटक करण्यात आली आहे नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 1 आणि 2 मार्चच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचे आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
लग्नाच्या वाढदिवसासाठी : काही बांगलादेशी नागरिक त्यांच्यापैकी एकाच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र येणार आहेत. नवी मुंबईतील घणसोली परिसरातील एका इमारतीत ते सर्व जमणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर कारवाई करत नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी रात्री या परिसरात छापा टाकला. रबाळे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबतची माहिती दिली आहे.
दहा महिला आणि आठ पुरुष ताब्यात : या कारवाईदरम्यान दहा महिला आणि आठ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस तपासादरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. यात ते गेल्या एक वर्षापासून विना वैध व्हिसा आणि पासपोर्ट शिवाय या परिसरात राहत होते हे समोर आले आहे. फॉरेनर्स अॅक्ट 1946 आणि पासपोर्ट नियम 1950 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या तपास सुरू आहे, असे नवी मुंबई पोलिसांनी सांगितले.
कृष्णानगर परिसरात कारवाई : 21 जानेवारी रोजी उल्हासनगरमधील कृष्णानगर परिसरात असलेल्या एका घरामध्ये बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे दहशतवादी विरोधी पथकाने विठ्ठलवाडी पोलिसांच्या सहाय्याने संयुक्तपणे छापेमारी केली होती. या छापोमारीत चौघांना अटक केली होती. लिटन जिन्नत शेख, खलील मनताज मंडल, नाजीमा अली नाजीर हजहर, शुकर खातून शेख असे अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. त्यांच्यासोबत अन्य साथीदार असण्याचा संशय पोलीस व्यक्त करीत होते. अटक करण्यात आलेले नागरिक वैध परवानगी कागदपत्रांविना राहत असल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.
भिवंडीतही कारवाई : २०२१ साली भिवंडी शहरातील शांतीनगर, नारपोली आणि भिवंडी शहर पोलिसांनी छापेमारी करून तब्बल ४० बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. भिवंडीतील अवनी टेक्सटाईल्समध्ये काम करणाऱ्या ९ बांग्लादेशी नागरिकांना कोनगाव पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली होती. त्यामुळे भिवंडी व आसपासच्या भागात आणखीही काही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती.