ठाणे - देशात एकीकडे प्रचंड महागाईचे वातावरण असताना दुसरीकडे सोन्याच्या वस्तूंना प्रचंड मागणी दिसून येत आहे. मग ते सोन्याचे दागिने असोत किंवा सोन्याची मिठाई. होय, ठाण्यात सोन्याची मिठाई बनवण्यात आली आहे जिचा भाव देखील सोन्या सारखाच आहे. तब्बल 15 हजार रुपये किलो दराने ही मिठाई विकली जात आहे. ती महाग असली तरीही ग्राहकांची तिला मागणी आहे.
हेही वाचा - कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले वाढले - एस. एम. देशमुख
ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानात ही मिठाई तयार करण्यात आली आहे. ही महाग असून देखील सर्वांना फ्री सॅम्पल टेस्टींग दिली जात आहे. या मिठाईला खास आकर्षक अशी बॉक्सची पॅकिंग देखील करण्यात आली आहे. या मिठाईसाठी जे जिन्नस वापरले आहेत ते देखील उच्च प्रतिचे महागडे असे असल्याने सोन्याची मिठाई अतिशय महाग आहे.
गणेशोत्सवात विकले 9 हजार रुपये किलोचे मोदक
तब्बल नऊ हजारांपर्यंतचे मोदक गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. अर्धा किलो, एक किलो ते तब्बल चार किलोपर्यंतचे मोदक या महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आले असून अंजीर, रोझ, ड्रायफ्रूट, मावा अशा अनेक प्रकारचे मोदक इथे पाहायला मिळतात. सात हजार ते नऊ हजार रुपयांच्या मोदकांवर शुद्ध सोन्याचा वर्ख लावण्यात आल्याची माहिती दुकानाचे व्यवस्थापक प्रमोद बापट यांनी दिली.
प्रशांत कॉर्नरमध्ये आपण नेहमीच ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या मिठाया उपलब्ध करून देतो व नवनवीन आणि आकर्षक मिठाया ग्राहकांच्या पसंतीस उतरतात, असे बापट यांनी सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याचा वर्ख लावून मोदकांची विक्री करणारे बहुधा आपण एकमेव मिठाईचे दुकान असल्याची माहिती बापट यांनी मोठ्या अभिमानाने दिली. मोदक म्हटले की, आपल्यासमोर उकडीच्या मोदकांनी भरलेले ताट येते. परंतु, प्रशांत कॉर्नरने साजरा केलेल्या मोदक महोत्सवात सोन्याचा वर्ख लावलेल्या मोदकासह अनेक प्रकारचे मोदक गणेशभक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.
मागील वर्षीही मोठी विक्री
दिवाळीच्या काळात देखील तब्बल 15 हजार रुपये किलो दराची मिठाई आपण ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती, त्याला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला, असेही बापट यांनी सांगितले. ठाण्यात अनेक ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रतीची मिठाई मिळते, परंतु प्रशांत कॉर्नर या दुकानात जी व्हेरायटी मिळते किंवा जी विविधता मिठामध्ये दिसून येते ती इतरत्र दिसत नाही, त्यामुळे आपण सणासुदीचे किंवा इतरही वेळी याच दुकानातून मिठाया खरेदी करतो, असे मनोगत ग्राहकांनी व्यक्त केले.
सोन्याचे सर्टिफिकेशन
या सुवर्ण मिठाईमध्ये वापरण्यात आलेल्या सोन्याचे सर्टिफिकेशन देखील आहे. त्यामुळे, उच्च प्रतीचे ड्राय फ्रुट आणि इतर साहित्य यामुळेच या मिठाईला मोठी मागणी आहे. ही मिठाई घेण्यासाठी 100 किलोमीटरवर असलेल्या मोखाडामधूनही ग्राहक येत आहेत. दरवर्षी नवनवीन मिठाई प्रकार हाच या व्यवसायात नाविन्याचा भाग आहे. तेच आवडत असल्याचे ग्राहक सांगतात.
हेही वाचा - जागा न मिळाल्याने भीमा - कोरेगाव प्रकरणाची सुनावणी ठप्प