नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेला शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या तांदळाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याने पनवेल शहर पोलिसांनी 110 टन रेशनिंगचे तांदूळ जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी भीमाशंकर खाडे (वय 40 वर्षे), इकबाल काझी (वय 45 वर्षे), लक्ष्मण पटेल (वय 42 वर्षे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पनवेल व नवी मुंबई परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेला पुरविण्यात येणाऱ्या रेशनच्या तांदुळाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. यावरुन पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या टेक केअर लॉगिस्टिक, पळस्पे येथील पलक रेशन गोडाऊन येथे काळाबाजाराने विक्री करण्यासाठी तांदळाचा अवैद्यरित्या साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी संबंधित गोडाऊनवर छापा टाकला.
या छाप्यातून 33 लाख 8 हजार किंमतीच्या प्रत्येकी 50 किलो वजनाच्या सुमारे 110 टन वजणाच्या 2 हजार 220 गोण्या तसेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, गव्हर्नमेंट ऑफ हरियाणा, असे नाव असलेल्या गोण्या व इलेक्ट्रॉनिक वजन काटे जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत अधिक तपास करीत आहेत.