ठाणे - सरकार कोणाचेही असो त्यांच्याकडून महिला सुरक्षेबाबत केवळ हमी देण्यात येते, मात्र अध्यापही महिलांचे असुरक्षीततेचे भय संपलेले नाही. त्यामुळे आजही महिलांना 'पावला पावला वर असते भय, अन म्हणे संरक्षणाची केली सोय' असा परिस्थिती निर्माण झाल्याचा प्रकार कल्याण पश्चिम व पूर्वेला जोडणाऱ्या स्कायवॉकवर समोर आला होता. या स्कायवर एका तरुणीची छेड काढल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी रात्री पोलिसांनी स्कायवॉकवर कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. यामध्ये ८० पोलिसांच्या ताफ्याने १० संशयितांना ताब्यात घेतेले. मात्र आजही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जैसे थे असल्याचे दिसून आले आहे.
.. मात्र कायद्याचा धाक नराधमांना नाहीच-
देशासह राज्यात महिलांवरील अत्याचार, छेडछाडी, अन्याय प्रकणारात दिवसेंदिवस वाढच होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील निर्भया हत्याकांडानंतर देशभर संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा केला. मात्र कायद्याचा धाक नराधमांना नसल्याचे समोर आले आहे.
स्कायवॉक गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचे साम्राज्य -
कल्याण पूर्व पश्चमेला जोडणारा स्कायवॉक गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचे साम्राज्य बनला आहे. परवा रात्रीच्या सुमारास स्कायवॉकवरून जाणाऱ्या एका तरुणीचा गर्दुल्ल्याने पाठलाग करत छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने केलेल्या आरडाओरडामूळे जमा झालेल्या नागरिकांनी या गर्दुल्ल्याला चांगलाच चोप दिल्याचा प्रकार समोर आला होता. परवाचा छेडछाडीचा हा प्रकार घडून 24 तासही उलटत नाहीत तोच स्कायवॉकवरून जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल चोरून त्याला मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला होता.
कल्याण स्कायवॉकवर लागोपाठ घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे स्कायवॉक आणि त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्कायवॉकवर सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत वारंवार नागरिकांकडून मागणी केली जात आहे. मात्र रात्रीच्या वेळेस घडलेल्या या दोन्ही गुन्हेगारीच्या गंभीर घटनांनंतर तरी प्रशासन जागे आणि बुधवारी सायंकाळच्या सुमारास ८० पोलीस कर्मचाऱ्याच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशन १० संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती कल्याण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे.