ठाणे: राज्यात दिवसेंदिवस मद्यविक्रीमध्ये वाढ झाली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्काकडून मोठ्या कारवाया करण्यात आल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या आणि केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी असलेल्या मद्याचा साठा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणण्याचा डाव हणून पाडण्यात राज्य उत्पादन शुल्क पथकाला यश मिळाले. तब्बल ४८ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात विदेशी मद्य आणि बिअरचा समावेश आहे.
अशी केली कारवाई: १ मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क पथकाने उधवा पोलीस चौकीसमोर, खाणवेल उधवा रोड, ता. तलासरी, जि. पालघर येथे पाळत ठेवली असता टाटा कंपनीचा टेम्पो ताब्यात घेण्यात आला. टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात फॉर सेल इन युटी दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासीत प्रदेशामध्ये विक्रीकरीता असलेल्या व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला भारतीय बनावटीचे विदेशी मद्याचे 330 बॉक्स व बियरथे 70 बॉक्स आढळून आले.
लाखोंचे मद्य जप्त: पथकाने आरोपी सुरेशकुमार दयाराम यादव, (वाहनचालक) रा. जौनपूर, उत्तरप्रदेश, आरोपी शैलेश मोहनभाई वर्मा रा. उधवाडा, जि. वलसाड, गुजरात, यांना अटक केली. परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरलेला टाटा कंपनीचा टेम्पो वाहनासह महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले एकूण 400 बॉक्स, लाकडी भुशाच्या 200 गोण्या, दोन मोबाईल व एक वाहनासह ४८ लाख ५६ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
मोठी कारवाई: काही दिवसांपूर्वीच ठाणे जिल्ह्यात मद्य जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली होती. कपड्याच्या आडून बनावट विदेशी मद्याच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला यश आले होते. छापेमारीत कल्याण पडघा मार्गावरील एका गोदामासह एका कारमधून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लाखोंचा विदेशी मद्याचा बनावटी साठा जप्त केला होता. या प्रकरणी दोन दारू माफियांना अटक केली होती.
लाखोंचा मुद्देमाल केला होता जप्त : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकाने कल्याण पश्चिम भागातील एका हायप्रोफाईल सोसायटीच्या पार्किंगमध्ये धाड टाकून त्या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमधून दमण राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण २५ बॉक्स जप्त करण्यात आले होते. या दोन्ही छापेमारीत एकूण २९१ बॉक्स व इतर साहित्य जप्त करण्यात आले होते. या छापेमारीत एकूण रू. ५६ लाख ७५ हजार ६४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर तिन्ही दारू माफिया विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.