सोलापूर - कुमठे गावातील भोपळे वस्तीवर दोघे बहिण-भाऊ खेळत असताना अचानक विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजता घडली. स्वराज सुजित भोपळे (वय ३) व स्वराली (राधा) सुजित भोपळे (वय २, रा. भोपळे वस्ती, कुमठे) असे त्या बहीण-भावंडाची नावे आहेत.
रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास स्वराज व स्वराली हे भोपळे वस्तीतील शेतातील विहिरीजवळ खेळत होते. खेळत असतानाच ते दोघेही नकळत विहिरीतील पाण्यात पडले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांना विहिरीतून बाहेर काढून वडिलांनी बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे.
या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे. चिमुकल्या बहिण-भावांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.