पंढरपूर (सोलापूर)- तालुक्यातील गुरसाळे येथे पोहण्यासाठी गेलेल्या एक तरुण सेल्फी घेण्याच्या नादात पाय घसरून भीमा नदी पात्रात पडल्यामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे. हुसेन रझा असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. तो पंढरपुरातील एका कन्स्ट्रक्शन कंपनीकडे कामाला होता. या घनटेची माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांकडून भीमा नदी पात्रात वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्यात येत आहे.
सेल्फी घेण्याच्या नादात गेला तोल-
गुरसाळे येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. भीमा नदी पात्र वरील पूल बांधण्याच्या कामावर कामगार म्हणून हुसेन रझा हा काम करत होता. रविवारी सकाळच्या सुमारास आंघोळ करण्यासाठी हुसेन रझा भीमा नदी पात्राकडे गेला होता. दरम्यान, पुलावर ऊभा राहून सेल्फी घेत असताना त्याचा पाय घसरल्यामुळे हुसेन रझा हा नदी पात्रात पडला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
या घटनेची माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गुरसाळे येथे धाव घेत भीमा नदी पात्रात वाहून गेलेल्या युवकाचा शोध सुरू केला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली होती. मात्र त्याचा शोध लागला नाही.
हेही वाचा - पोलिसांच्या विनंतीनंतर सोमैया कराडमध्येच उतरले; राष्ट्रवादी-भाजप संघर्ष टळला
हेही वाचा - जळगाव : वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये चौघांचा बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ, तर अन्य दोघे चुलत बहीण-भाऊ