सोलापूर - बाजारपेठेत महिलांची छेड काढणाऱ्या एका सडक सख्याहरीला एका डॅशिंग महिला पोलिसाने भर चौकात चोप दिला. प्रियांका माने, असे या महिला पोलिसाचे नाव असून त्या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत.
हा प्रकार मंगळवेढा येथील दामाजी चौकात घडला आहे. मुंबई पोलीस दलात नोकरीला असलेल्या प्रियांका या रक्षाबंधनासाठी मंगळवेढा येथे आल्या होत्या. सणानिमित्त खरेदीसाठी जात असताना एका सडकसख्याहरीने भर बाजारपेठेत असलेल्या चौकात त्यांची छेड काढली. त्याचवेळी या संतप्त या महिला पोलिसाने त्याची भर चौकात चप्पलने धुलाई केली.
यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी झाली होती. मग बघ्यांनीही त्याला कपडे फाटेपर्यंत चोप देत चांगलीच अद्दल घडवली. यादरम्यान, त्या सडकसख्याहरीने पळ काढला. त्यामुळे त्याचे नाव पत्ता कळू शकला नाही. पर्यायाने पोलिसात गुन्हाही दाखल झालेला नाही. मात्र, त्या डॅशिंग महिला पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.