सोलापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या संबोधनात दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंतरोळी या गावाची दखल घेतली ही खूपच अभिमानाची बाब आहे. त्यांची कौतुकाची थाप सोलापूरकरांवर पुढील विकासकामासाठी उपयुक्त ठरणारी आहे. असा विश्वास सरपंच कोमल करपे यांनी व्यक्त केला. सुमारे 2 हजार 298 लोकवस्तीच्या या गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा सरपंच करपे यांनी आधार घेत अरोग्य विभागाच्या सहाय्याने काम सुरू केले आणि गाव कोरोना मुक्त केले.
टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटमुळे गाव कोरोनामुक्त झाले -
अंतरोळी ग्रामपंचायतीतर्फे प्रत्येक व्यक्तीला मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. स्वच्छता व सोशल डिस्टन्सिंगबाबत गावातील तरुणांना सहभागी करून घेत कोरोनाबाबतची घरोघरी जनजागृती केली. कोरोना योद्धा समितीची स्थापना करण्यात आली. ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी प्रचार व प्रसार केला. समजावून सांगतानाच मास्क न वापरणारे, शासन नियमांचा भंग करणारे यांच्यावर प्रसंगी कठोर होत दंडात्मक कारवाईही केली. कडक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम म्हणून गाव कोरोनामुक्त झाले, अशी माहिती सरपंच कोमल करपे यांनी दिली.
फेब्रुवारीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंत्रोळी येथील जिव्हाळा गतिमंद शाळेत एकाच वेळी 46 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामुळे अंतरोळी गावासह दक्षिण सोलापूर तालुका प्रशासनही हादरले होते. अशा कठीण परिस्थितीत कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना वयाच्या 21 व्या वर्षी सरपंचपदी विराजमान झालेल्या उच्चशिक्षित कोमल करपे यांनी पदर खोचला आणि गाव कोरोनामुक्त करण्यासाठीचा संकल्प हाती घेतला आणि तो प्रत्यक्षात उतरवला. त्यांच्या कार्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली व रविवारी कोमल करपे यांचे कौतुकही केले.
कोरोनाची दुसरी लाट गावात पसरण्यापूर्वीच थोपवली -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सोलापुरात एप्रिल व मे महिन्यात रौद्ररूप धारण केले होते. शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असताना अंतरोळी गावात सुमारे पंचवीसजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. ही संसर्ग साखळी तोडण्यासाठी सरपंच करपे यांनी एक टीम तयार केली. यामध्ये उपसरपंच सोनाली खरात, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापू शेख, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता नलावडे, अंत्रोळी उपकेंद्राच्या आरोग्यसेविका सुनीता वारे, आरोग्य समुदाय अधिकारी डॉ. संकेत पुकाळे, आरोग्य सेवक प्रवीण टेकाळे, आशा वर्कर रंजना धेंडे, सविता शिंदे तसेच सर्व अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने ट्रेसिंग टेस्टिंग अन ट्रीटमेंट या त्रिसूत्रीसह 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' याचा अवलंब करून गाव कोरोनामुक्त केले.