सोलापूर - शहर हद्दीत येणाऱ्या एका गावात विधवा महिलेचा गळा आवळून खून झाला आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. पोलिसांनी तपासाची पथके तैनात केली असून खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मारेकऱ्याला लवकरच अटक केले जाईल, अशी माहिती विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी दिली.
सोलापूर-शहराला लागूनच असलेल्या कुमठे गावात लक्ष्मीबाई शिवाजी माने (वय 40) या विधवा महिलेचा गळा आवळून खून झाला. पोलिसांनी रविवारी दिवसभर याचा तपास केला. पण अद्यापही मारेकऱ्याचा शोध लागला नाही. ही घटना शनिवारच्या रात्री घडली आहे.
लक्ष्मीबाई घरात एकट्याच राहत होत्या-
मयत लक्ष्मीबाई माने यांच्या पतीचे निधन होऊन सहा वर्षे झाली आहेत. एक मुलगा व दोन मुली असा परिवार लक्ष्मीबाई यांचा आहे. मागील पाच वर्षापासून लक्ष्मीबाई या घरात एकट्याच राहत होत्या.
रविवारी सकाळी ननंद कविता भोसले यांच्या लक्षात आले की, लक्ष्मी या घरात पडलेल्या आहेत. त्यांच्या पायाच्या नखातून रक्त येत आहे. चेहरा देखील काळपट पडला आहे. याबाबत कविता यांनी पोलिसांना माहिती दिली.
एक संशयीत व्यक्ती ताब्यात-
विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ताबडतोब कुमठे गावात पोहोचले आणि तपास सुरू केला. मृतदेह व आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. पंचनामा केला आणि तपासासाठी एका संशयीत व्यक्तीस ताब्यात घेलते आहे. लवकरच खुनातील आरोपी पुढे येतील. तसेच खुनाचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा- जळगावातील शिवाजी नगरात पुन्हा तरुणाचा खून; एक संशयित ताब्यात