सोलापूर - सावधान तूम्ही एखाद्या कामानिमित्त शासकीय कार्यालयात दूचाकीवरून जात असाल आणि तूमच्याकडे हेल्मेट नसेल तर तूम्हाला शासकीय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. शासकीय कार्यालयात दूचाकी घेऊन प्रवेश पाहिजे असेल तर तूम्हाला हेल्मेट घालूनच प्रवेश करावा लागणार आहे. शासकीय कार्यालयात दूचाकीवरून येणाऱ्या प्रत्येकाला हेल्मेट असल्याशिवाय प्रवेश न देण्याच्या सूचना सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
सोलापूर शहरात हेल्मेट सक्तीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. विना हेल्मेट दुचाकी स्वारांवरील कारवाई आणखी तीव्र करण्याच्या सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई तीव्र करा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना दिल्या आहेत.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, पोलीस निरीक्षक विजया कुर्री, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत आदी उपस्थित होते. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी जिल्ह्यातील अपघातांच्या संख्येत कमी व्हावी यासाठी केलेल्या विविध उपायांची माहिती दिली. मात्र, वाहनांच्या संख्येत वाढ होत असून अपघातात मरण पावणाऱ्यांमध्ये दुचाकी स्वारांची संख्या सुमारे 60 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी विना हेल्मेट दुचाकीस्वारांवरील कारवाई आधिक तीव्र करण्यात यावी, असे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर शासकीय कार्यालयाच्या परिसरात विना हेल्मेट दुचाकीस्वाराना प्रवेश दिला जाऊ नये अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केल्या आहेत. शासकीय कार्यालयात येणाऱ्या दूचाकीस्वारांना विना हेल्मेट प्रवेश न देण्याची अंमलबजावणी ही पोलिस प्रशासनाने करावी असेही जिल्हाधिकारी यांनी या बैठकीमध्ये सांगितले आहे.