सोलापूर- जमावबंदी आदेश असतानादेखील अनेकजण विनाकारण बाहेर फिरत आहेत. तसेच यंत्रणेत काम करणाऱ्यांशी हुज्जत घालत असल्याचा प्रकार दिसून आला आहे. त्यामुळे, प्रशासनाने आदेशाची पायमल्ली करणाऱ्या ३३० जणांविरूद्ध सोलापुरात गून्हा दाखल केला आहे. तसेच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी व उपचारासाठी खाजगी डॉक्टरांची देखील मदत घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी आवश्यकता पडल्यास शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना विषाणू ग्रस्तांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था केली जाईल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल आयएमएच्या पदाधिकाऱ्यांना केले. त्यावर पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला पूर्ण मदत करण्याची ग्वाही दिली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यकता भासल्यास शहरातील ५ खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण वार्ड तयार करावे लागतील. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी २५ बेड्सची विलगीकरण सुविधा करावी लागेल. यासाठी आएमएच्या सदस्य डॉक्टरांसोबत चर्चा करावी, असेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. यावर इंडियन मेडिकलच्या असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. पुष्पा अग्रवाल यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिक जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी मदत करायला तयार असल्याचे सांगितले.
या बैठकीत महापालिका आयुक्त दीपक तावरे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप कुमार ढेले, आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार यांच्यासह इंडियन मेडिकलचे असोसिएशनचे सचिव डॉ. वच्चे, डॉ. रायचूर, डॉ. ज्योती चिडगुपकर, डॉ. सचिन मुळे, डॉ. दिलीप आपटे, डॉ. पागे, डॉ. ज्योती हिरेकेरुर, आदी उपस्थित होते. दरम्यान, जिल्ह्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे. मात्र, कोणी साठेबाजी केल्याची तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. त्याचबरोबर, परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या सुमारे ६२७ वाहनांची आणि २००० नागरिकांची तपासणी केली असल्याचे देखील जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
हेही वाचा-प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे नागरिकांना भावनीक आवाहन