करमाळा (सोलापूर) - दहिगाव उपसा सिंचन योजनेतून टेल तू हेड म्हणजेच शेवटच्यापासून ते सुरुवातीच्या गावापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, घोटी या टेल म्हणजेच शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचले नाही. यामुळे या गावात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जेऊन प्रादेशिक योजना सुरु करावी व घोटी गावाला पाण्याची सोय करावी, यामागणीचे निवेदन गावकऱ्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे दिले आहेत. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, जिल्हाधिकारी, आमदार, पालकमंत्री देण्यात आल्या आहेत.
घोटी गावची लोकसंख्या 5 हजार असून गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावातील सर्व विंधनविहरी कोरड्या पडल्या आहेत. घोटी हे गाव दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या शेवटच्या टप्प्यात येते. (टेल मायनर) या योजनेतून घोटी गावाला रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन योग्य प्रमाणात मिळालेले नाही. या आवर्तनातून गावठाणातील ओढे बंधारे भरणे अपेक्षित होते. पण, पाण्याच्या अयोग्य वाटपामुळे हक्काचे पाणी गावाला मिळालेले नाही. त्यामुळे गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याप्रकाराची चौकशी करून नियमाप्रमाणे दहीगावचे पाणी घोटी गावासाठी लवकरात लवकर चालू करावे. अन्यथा घोटी गावाचे नाव टेल आरखड्यातून नाव वगळून पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
हेही वाचा - सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या 275 वर; 17 जणांचा मृत्यू