सोलापूर - जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून रब्बी हंगामात पहिले आवर्तन आज सकाळी सोडण्यात आले. उजनी धरणातील उजवा आणि डावा कालवा लाभक्षेत्रातील आवर्तन सिंचनासाठी सोडण्यात आले. तर, 19 जानेवारी रोजी भीमा नदी व बोगद्यातून पाणी सोडण्यात आले.
हेही वाचा - एकवीस वर्षीय ऋतुराज ठरला सर्वात तरुण ग्राम पंचायत सदस्य
कालव्यांद्वारे 3 लाख 50 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली
उजनी धरणात सध्या शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातूनच भीमा नदीतून सोडलेले पाणी हे 10 दिवस चालणार असून यासाठी 5.50 टीएमसी पाणी लागणार आहे. कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याची पाळी 30 दिवस चालणार असून, ती 6 टीएमसी राहणार आहे. भीमा-सीना बोगद्याद्वारे सोडलेल्या पाण्याची पाळी ही 30 दिवस चालणार असून याद्वारे 2.5 टीएमसी पाणी लागणार आहे. या दोन्ही कालव्यांद्वारे 3 लाख 50 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येत आहे.
रब्बी पिकांना होणार फायदा
कालव्याद्वारे 6 टीएमसी पाणी वापरले जाणार आहे. लाभक्षेत्रातील सिंचनासाठी पहिले आवर्तन 19 जानेवारी रोजी भीमा नदी व बोगद्यातून सोडण्यात आले. 21 जानेवारी रोजी पंढरपूर येथील भीमा नदी पात्रात हे पाणी पोहोचण्याची शक्यता आहे. रब्बी हंगाम सुरू असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आवर्तनाचा फायदा होणार आहे. तसेच, उजनी धरणातून उजवा व डावा कालवा लाभक्षेत्रातील सिंचनासाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. या आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील ऊस, मका, ज्वारी, गहू, हरभरा व भुईमूग आदी पिकांना मोठा फायदा होणार आहे.
उजनी कालव्याद्वारे 30 दिवसाचे आवर्तन
उजनी कालव्याद्वारे 30 दिवस आवर्तन चालू राहणार असून कालव्यातून प्रारंभी 500 क्युसेक, नंतर प्रत्येक सहा तासानंतर पाणी वाढवून ते 3 हजार ते 3 हजार 200 क्युसेकपर्यंत मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. मुख्य कालवा 20 कि.मी. दूर असून पाणी शेवरे गावच्या हद्दीतून उजव्या कालव्यात 119 कि.मी, तर डाव्या कालव्यात 126 कि.मी पर्यंत जाणार आहे. डाव्या कालव्याद्वारे माढा, पंढरपूर (उत्तर भाग) मोहोळ, उ. सोलापूर, अक्कलकोटपर्यंतचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. उजव्या कालव्याद्वारे माळशिरस (पूर्व भाग), पंढरपूर (दक्षिण-पश्चिम) भाग, सांगोला व मंगळवेढापर्यंत पाणी मिळणार आहे.
हेही वाचा - 'जमात-ए-इस्लामी हिंद' महाराष्ट्रद्वारे अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियानाचे आयोजन