पंढरपूर - माघी वारीनिमित्ताने पंढरपुरात वास्तव्यास असणाऱ्या वारकऱ्यांना रविवारपर्यंत (२१ फेब्रुवारी) मठ, धर्मशाळा, लॉज सोडून जाण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वारकरी संप्रदायाला अशाप्रकारे हुसकावून लावू नये. मठात राहणारे वारकरी अतिरेकी आहेत का? असा सवाल ह.भ.प. बंडातात्या महाराज कराडकर यांनी प्रशासनाला केला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय पोलीस प्रशासनाविरुद्ध आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
मठात राहणाऱ्या वारकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश-
अवघ्या दोन दिवसांवर माघी एकादशी येऊन ठेपली आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने माघी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात होणारी संभ्याव गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पंढरपुरात एका दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. माघी यात्रेनिमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी मठामध्ये येऊन राहत आहेत. त्या वारकऱ्यांना 21 फेब्रुवारीपर्यंत मठ रिकामे करण्याचे आदेश पोलीस प्रशासनास देण्यात आले आहेत. यामुळे वारकरी संप्रदायातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. विविध वारकरी संप्रदायाच्या संघांनी याला विरोध दर्शविला आहे.
वारकरी संप्रदाय आतंकवादी आहे का?
माघी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विविध मठांमध्ये वारकरी येऊन राहिले आहेत. पोलीस प्रशासनाकडून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते वारकरी अतिरेकी नव्हे असे बंडातात्या कराडकर यांनी म्हटले आहे. राज्य शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे सर्वात जास्त पालन वारकरी संप्रदाय करत आहे. अन्य कुठेही कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथील मठांमध्ये भजन, कीर्तन चालू आहेत. ते बंद करून शासन कोणते पाप करत आहे, असे संतापजनक सवाल ह.भ.प कराडकर महाराज यांनी उपस्थित केला.