पंढरपूर - कार्तिकी वारीच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाच्यावतीने कार्तिकी वारी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कार्तिकी वारीवर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध घालू नयेत. राज्य सरकारने असे केल्यास वारकरी संप्रदाय येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकेल, असा इशारा राम कृष्ण महाराज वीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.
पंढरपूर येथील वासकर वाड्यात सर्व वारकरी संप्रदायाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विविध वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी उपस्थित होती. रामकृष्ण महाराज वीर बोलताना म्हणाले, वारकरी संप्रदायाकडून कार्तिकी वारी समन्वय समिती करण्यात आली आहे. आषाढी वारी प्रमाणे राज्यशासन व प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची बंधने कार्तिकी वारीसाठी लागू करू नयेत, आषाढी वारी दरम्यान वारकरी संप्रदाय राज्य शासनाला संपूर्ण प्रकारे सहकार्य केले होते. मात्र कार्तिकी वारी काळात कोरोनाचा प्रादुर्भावही कमी असणार आहे, त्यामुळे आषाढी वारीप्रमाणे कार्तिकी वारीसंदर्भात कोणतेही निर्बंध या वारीस चालू देणार नाही, अशी भूमिका या समितीने घेतली आहे.
नियमांचे पालन करू
कार्तिकी वारीसाठी वारकरी संप्रदायाकडून राज्य शासनाकडे पंढरीतील प्रत्येक मठामध्ये 50 वारकऱ्यांना राहण्याची परवानगी देण्यात यावी, वारी निमित्ताने वारकऱ्यांना भजन व कीर्तनाची परवानगी देण्यात यावी, कार्तिकी वारी दरम्यान वारकरी संप्रदायकडून कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा -
राज्य सरकारकडून आषाढी वारी प्रमाणे कार्तिकी वारी दरम्यान कोणतेही निर्बंध किंवा संचारबंदी लागू केली तर वारकरी संप्रदाय हे खपवून घेणार नाही. तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत वारकरी संप्रदाय मतदान करणार नाही, असा इशारा राम कृष्ण महाराज वीर यांनी दिला.