सोलापूर - संपूर्ण महाराष्ट्रासह कोट्यवधी लोकांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाचा विवाह सोहळा मोठ्या थाटा-माटात पार पडला. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी जवळपास 2 टन फुलांचा वापर मंदिर सजावटीसाठी करण्यात आला आहे.
हेही वाचा - पंढरीचा राजा सजला 'तिरंग्यात', प्रजासत्ताक दिनानिमित्त आकर्षक सजावट
वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाला होता, असा उल्लेख एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवरात केला आहे. हा विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी म्हणून संपूर्ण देऊळ विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवले जाते. सकाळी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला शुभ्र वस्त्र तर रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ, हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकारांनी सजवले होते. साधारणत: सकाळी अकरा वाजता रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेला गेला. तिथे गुलालाची उधळण झाली. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेऊन तिथेही गुलालाची उधळण झाली. त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या अलंकाराने सजवलेल्या उत्सवमूर्ती या विवाह सोहळ्य़ाच्या ठिकाणी आणल्या गेल्या. यानंतर अंतरपाट धरला गेला आणि उपस्थितांनी फुलांच्या अक्षता टाकून देवाचा विवाह सोहळा पार पडला.
हेही वाचा - सोन्याचं बाशिंग.. लगीन देवाचं ! पंढरीत आज विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा
आता सावध सावधान.. ही मंगलाष्टक म्हटल्यावर सर्व उपस्थित टाळ्या वाजवून आणि टाळ-मृदुंगाच्या जयघोषात आपल्या लाडक्या देवाचा विवाह सोहळा पूर्ण केला. यंदाच्या या सोहळ्याला मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पूदलवाड, मंदिर समितीचे सदस्य यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. हा विवाह सोहळा झाल्यावर सायंकाळी दोन्ही मूर्तीची नगरामधून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाला पांढराशुभ्र पोशाख परिधान करण्यात आला.