सोलापूर (पंढरपूर) - आता हिवाळा ऋतू सुरू झाल्याने हवेत गारवा वाढला आहे. थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी सामान्य माणसाप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणीला देखील ऊबदार कपड्यांचा पोषाख परिधान करण्यात आला आहे.
शरद ॠतू सुरू झाल्याने परंपरेप्रमाणे देवाच्या पोषाखात बदल करण्यात आला आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीला थंडी वाजू नये यासाठी मंदिर समितीकडून रजई, शाल, मफलर व कानपट्टी असा पोशाख परिधान करण्यात आला. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी माहिती दिली.
दोन दिवसांपूर्वी पक्षाळपूजे निमित्ताने केली होती फुलांची आरास -
कार्तिक वारी झाल्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शिनवटा काढण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. त्याला पक्षाळ पूजा असे म्हणतात. त्यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा, सोळखांबी, नामदेव पायरी, सभामंडप, अशा विविध भागाना ऑर्चिड, कार्नेशन, गुलाब, जरबेरा, मोगरा ,कामिनी , तुळशी, झेंडू, शेवंती, आष्टर, गुलाब, तगर,जाई जुइ अशा विविध फुलांनी आकर्षक पध्दतीने सजवण्यात आले होते. या पंधरा प्रकारच्या फुलांमध्ये सावळा विठुराया आणि रुक्माई मातेचे रूप अधिकच खुलून दिसत होते.