पंढरपूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज अधिकमासातील कमला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. पंधरा प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांमध्ये सावळा विठुराया आणि रुक्माई मातेचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. तसेच मनोहरी पोशखात सावळ्या विठुरायाचे सौंदर्य आणखीन नयनरम्य दिसत आहे. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने या फुलांची आरास याची देही देही याची डोळा पाहण्याचा योग्य सध्या तरी नाही. भाविकांना लागलेली विठुरायाच्या दर्शनाची ही आस आज कमला एकादशीच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने व्हिडिओ दृश्यातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
आज कमला एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात विविध रंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. तसेच विठ्ठल मंदिराच्या मुख्य प्रवेशाद्वारा नेत्रदीपक आणि सुबक अशी सावळ्या विठूरायाची लक्ष्यवेधी रांगोळी रेखाटली आहे. या सजावटीत विठ्ठल रुक्मिणी मातेचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. पुणे येथील युवा उद्योजक राम जांभुळकर यांच्यावतीने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा ही सजावट करण्यात आली आहे.
मंदिराचा गाभारा, सोळखांबी तसेच विविध भागांना ऑर्चिड, कार्नेशन, गुलाब, जरबेरा, मोगरा ,कामिनी ,तुळशी, झेंडू, शेवंती, आष्टर, गुलाब , तगर ,जाई जुई अशा विविध फुलांनी आकर्षक पध्दतीने सजवण्यात आले आहे. तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेला परिधान कऱण्यात आलेला पोशाखही सावळ्या रुपावर नजर खिळवून ठेवत आहे.