पंढरपूर : आषाढी एकादशीच्या अधिकृत महापूजेच्या काळात मुखदर्शन घेणारे भाविक मुख दर्शन रांगेत अडकून राहतात. शासकीय महापूजेच्या काळात मुखदर्शन सुरू राहिल्यास वारकरी भाविकांना त्याचा लाभ होईल. मंदिर समितीने मुखदर्शन सुरू ठेवण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. यासाठी मंदिर समितीने व्हीव्हीआयपींच्या बसण्याच्या जागेबाबत आवश्यक नियोजन करावे, पूजा करणाऱ्यांचा सन्मान करावा. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत महापूजेनंतर व्हीआयपी दर्शन होणार नाही. पारंपारिक दिंड्यांचे प्रथा परंपरेप्रमाणे दर्शन सुरू राहील याची दक्षता मंदिर समितीने घेवून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
भाविकांना प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा : पालखी तळावर, मार्गावर भाविकांना प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच वारकरी भाविकांसाठी प्रथमच महिला स्नानगृह, द्विशताब्दी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता, आरोग्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. चंद्रभागा वाळवंट, आवश्यक ठिकाणी चेंजिंग रूम तयार करण्यात याव्यात. शौचालयांमध्ये नियमित, पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा असे पाटील म्हणाले.
बैठकीत सूचना : स्वच्छतागृहांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याऐवजी पालिका, प्रशासनाने अन्य काही उपाययोजना आखण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. तसेच पंढरपूर शहराजवळील खासगी जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत. जेणेकरून 65 एकर जागा भाविकांच्या सोयीसाठी अधिक जागा उपलब्ध होईल, असेही पालकमंत्री विखे-पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आषाढी वारी कालावधीत भाविकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
भक्त निवास येथे झालेल्या बैठकीस खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसिलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.