पंढरपूर (सोलापूर) - येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 27 नोव्हेंबरला एक दिवस पंढरीतील नागरिकांसाठी खुले करण्यात आले. विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेण्याची परवानगी विठ्ठल मंदिर समितीकडून देण्यात आली होती. सकाळपासून अनेक भाविकांनी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. रात्री बारा वाजेपर्यंत पंढरपुरकरांना हे दर्शन घेता येणार आहे. याबाबत विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली होती.
हेही वाचा - 'हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का...'
मंदिर सुरू झाले होते, पण...
गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या विठ्ठल मंदिराने 16 नोव्हेंबरपासून भाविकांना मुखदर्शनाची परवानगी दिली आहे. मात्र, त्यामध्ये एक हजार भाविकांना मंदिर प्रशासनाकडून दर्शनाची सोय करण्यात आली होती. यानंतर त्यामध्ये बदल करत 2000 वारकरी भाविकांना ऑनलाइन बुकिंगद्वारे मुखदर्शनाची सोय करण्याात आली. यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पांडुरंगाची कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आली आणि विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन 25 ते 27 नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आले होते. मात्र, यानंतर आज (शुक्रवारी) स्थानिक नागरिकांना मुखदर्शनाची परवानगी देण्यात आली.
दरम्यान, आज 27 नोव्हेंबरला मुखदर्शनासाठी स्थानिक नागरिकांना ओळखपत्राची गरज बंधनकारक करण्यात आली आहे. ओळखपत्राशिवाय कोणत्याही भाविकाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही आहे. तसेच 65 वर्षांवरील व्यक्तीला, गर्भवती महिलांना तसेच दहा वर्षाखालील लहान मुलांना, आजारी व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आला आहे.