बारामती- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाद्वारे जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन व कोविड-19 विषाणूचे संक्रमण वाढविण्यास जाणून बुजून एक प्रकारे हातभार लावत असल्याच्या प्रकरणी बारामतीत पाच जणांवर शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
पुणे जिल्ह्यासह राज्यात कोरोनाने डोके वर काढले असून, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदीसह अत्यावश्यक सेवा वगळून इतर विविध आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश पारित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी किशोर धनंजय माने (रा.अनंतआशा नगर,बारामती. चायनीज गाडा), अनिल लक्ष्मण गायकवाड (रा. तांदुळवाडी वेस, आईस्क्रीमचा गाडा), दीपक राजेंद्र जाधव (रा. कैकाडा कॉलनी, अंडा भुर्जी गाडा), सागर सुभाष टिळेकर (रा. महादेव मळा, हॉटेल सुरंजन), कन्हैया गोपाल नैनावत (रा. चांदवाडी जिजामाता नगर, आईस्क्रीमचा गाडा), यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
रात्री दहानंतर आस्थापने चालू ठेवून, ग्राहकांची गर्दी जमावल्याचे निदर्शनास आल्यावरून वरील पाच जणांविरोधात भा.द.वि. कलम १८८,२६९,२९० व साथीचा रोग प्रतिबंधक अधिनियम कायदा १८९७ कलम २,३,४ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केले आहे.
हेही वाचा - अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त