सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी आषाढी वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वारकऱ्यांच्या जीवाची घालमेल सुरु आहे. अशातच प्रयत्नांती परमेश्वर अशी भावना असलेले काही वारकरी पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेनं निघत आहेत. अशाच एका वारकऱ्याला पंढरीच्या वेशीवर पोलिसांनी अडवले. सुरूवातीला पोलिसांना वाटलं हा वारकरी असल्याचं भांडवल करून वाद घालेल. पण जसं पोलिसांनी त्याला अडवलं तसा वारकरी खाली झुकला अन त्यानं पोलिसांतचं विठ्ठलाचं दर्शन झाल्याचं सांगून माघारी घराकडे फिरला.
हेच दृश्य पोलिसांना भावून गेलं. मग पोलिसांनी हाच धागा पकडून 'कोरोनाची महामारी: यंदाची वारी घरच्या घरी' हा प्रबोधनपर व्हिडिओ राज्यातील वारकऱ्यांसाठी तयार केला. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पंढरपूरच्या ऐतिहासिक वारीची परंपरा खंडित होऊ नये, म्हणून सरकारच्यावतीने परवानगी देण्यात आलेल्या मानाच्या 9 संतांच्या पादुका-पालख्या दशमीला थेट हेलिकॉप्टरने पंढरपूरला आणल्या जाणार आहेत. तशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पंढरपूर दौऱ्यात दिली आहे. त्यामुळं आता कोणाही वारकऱ्याला पंढरपूरला पायी अथवा अन्य कुठल्याही मार्गाने येता येणार नाही. त्यासाठी सरकार चोख बंदोबस्त ठेवत आहे. दरम्यान, आज पंढरपुरातील प्रदक्षणा मार्गावर कोरोनाचा रुग्ण आढळल्यानं यंदाची वारी ..घरच्या घरी या संकल्पनेला बळकटी देण्यात येत आहे.