सोलापूर - सडक्या मनोवृत्तीचा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, याचे उदाहरण पंढरपूर तालूक्यात पाहायला मिळाले. तनाळी गावातील शेतकरी नवनाथ लवटे यांच्या द्राक्ष बागेवर अज्ञात व्यक्तीने 'तणनाशक' फवारणी करण्याच्या टाकीमध्ये टाकले, त्यामुळे संपूर्ण द्राक्ष बाग जळून गेली आणि नवनाथ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पंढरपूर तालुक्यातील तनाळी येथील शेतकरी नवनाथ लवटे यांची ३ एकर द्राक्ष बाग आहे. मोठ्या मेहनतीने पोटच्या पोराप्रमाणे त्यांनी या बागेची जोपासना केली. मात्र, बागेत फवारणी करण्याच्या पाण्याच्या टाकीत कोणीतरी तणनाशक टाकल्यामुळे त्यांची संपूर्ण द्राक्ष बाग जळून गेली. संपूर्ण बाग जळून गेल्यामुळे शेतकऱ्यांने ३ एकर बाग तोडून टाकली. गेल्या वर्षी नवनाथ यांना द्राक्ष बागेतून जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, यावर्षीच्या या घटनेमुळे लवटे कुटुंबावर आभाळ कोसळले.
हेही वाचा - विषमता आणि बेरोजगार यापासून मुक्ती म्हणजे देशभक्ती - प्रा. अजित अभ्यंकर
नुकसान झालेल्या द्राक्ष बागेला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव पवार, पंढरपूर पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी भेट दिली. कृषी अधिकाऱ्यांनी या बागेची पाहणी करून पंचनामे करावेत आणि या शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यात यावी. सोबतच शेतकऱ्यांच्या बाबतीत पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून पोलिसांनी आरोपींना शोधून शिक्षा करावी, अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक व पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख यांनी केली.
लवटे यांच्या द्राक्ष बागेत झालेल्या नुकसानीच्या घटनेमुळे तनाळी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा - 24 तारखेला बार्शीचा 'म्होरक्या' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला