पंढरपूर - 'राज्यात महाविकस आघाडीचे सरकार आहे. काही दिवसांपासून हे सरकार पडेल पडेल असे वाटत होते. मात्र हे सरकार पडत नाही. पण शिवसेनेचे भविष्य भाजपसोबत आहे. राज्यामध्ये अडिच-अडिच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून देण्याची भाजपची तयारी आहे. शिवसेनेचा भाजपसोबत राहिल्याने फायदा तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमुळे नुकसान होणार आहे,' असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी व काँग्रेसची उठसूट मोदींवर टीका - आठवले
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस प्रत्येक गोष्टीवरून टीका करतात. मात्र केंद्र सरकारकडून जास्त प्रमाणात लस महाराष्ट्राला मिळाली आहे. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी उठसूट मोदी यांच्यावर टीका करत असतात', असेही आठवलेंनी म्हटले.
70 वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीने आरक्षण का दिले नाही?
'देशातील इतर राज्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण आहे. त्यामुळे राज्य सरकारने 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देण्यासाठी कोणतीही हरकत नसावी. पण, 70 वर्षांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत आहे. त्यांनी 50 टक्क्यांहून जास्त आरक्षण का दिले नाही?', असा सवालही रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केला आहे.
हेही वाचा - राज्यात ऑक्सिजन मर्यादित, सण-उत्सवात नियमांचे उल्लंघन करू नका! मुख्यमंत्र्यांचे आवाहन