पंढरपूर (सोलापूर) - गेल्या दोन दिवसांपासून पुणे, सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणारे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. उजनी जलाशयातील 41 पैकी 16 दरवाजे 0. 35 सेंटिमीटरने वर उचलून 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत करण्यात आला आहे. वीर धरणातून नीरा नदीमध्ये 5 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे भीमा नदी काठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा जलसंधारण विभागाकडून देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील भीमा नदी खोऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच भीमा नदी खोऱ्यातील 90 टक्के धरणे ओव्हर फ्लो झाल्याची माहिती जलसंधारण विभागाकडून देण्यात आली आहे. उजनी धरणाची क्षमता 123 टीएमसी आहे. 109 टीएमसी पाणीसाठा उजनी जलाशयांमध्ये उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
हे ही वाचा - Lakhimpur Case : केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा घ्या - नवाब मलिक
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. उजनी जलाशयांमध्ये 109 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दौंड येथून 8,116 तर बंडगार्डन येथे 2,916 विसर्ग उजनी धरणात सोडण्यात आला आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग करण्याची दाट शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील वीर धरणांमधून नीरा नदीमध्ये 5 हजार क्युसेक पाणीसाठा सोडण्यात आला आहे. यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. भीमा नदी पात्रात 25 हजार क्युसेक्स पाणी साठा वाहत आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना अति सतर्कतेचा इशारा पंढरपूरचे प्रांत अधिकारी गजानन गुरव यांनी दिला आहे.