सोलापूर (माढा) - पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोघा ऊस तोड कामगारांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटना माढा तालुक्यातील भेंड गावात घडली. बुधवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास ही बाब समोर आली. कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल तीन तासानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार: ताहिर हुसेनच्या तीन सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक
राजू रावसाहेब माळी (वय ४२, रा. चंदनापरी, तालेवाडी, ता.अंबड जि. जालना), भगवान उत्तम चौधरी (वय ४०, रा मादळमोही ता. गेवराई, जि. बीड) अशी विहिरीत पडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. भेंड गावच्या शिवारत असलेल्या शैलेश भारत दोशी यांच्या (ग.क्र १९१) शेतात असलेल्या विहिरीतील पाणी आणण्याकरिता दोघे ऊसतोड कामगार गेले असता विहिरीतून खाली उतरत असताना त्यांचा तोल गेला आणि बुडून मृत्यू झाला. दोघांनाही पोहता येत नव्हते.
कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेने दोघांचे मृतदेह अडीच वाजता दाखल झाले. कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे. अथक प्रयत्नानंतर मृतदेह विहिरी बाहेर-विहिरीत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांमार्फत मिळताच सहायक पोलीस निरिक्षक चिमणाजी केंद्रे यांनी पोलिसांसमवेत घटनास्थळी तत्काळ पोहोचले. पोलीस मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्यांच्या मदतीसाठी ग्रामस्थ सरसावले. दोरीच्या सहाय्याने पोलिसांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर सव्वा बारावाजता भगवान चौधरी यांचा तर राजू माळी यांचा दिड वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
हेही वाचा - मनसेचे शॅडो कॅबिनेट म्हणजे 'हा खेळ सावल्यांचा', सेनेचा खोचक टोला