सोलापूर (पंढरपूर) - कर्नाटक राज्यातून एका आलिशान कारमध्ये पानमसाला व गुटख्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचा पानमसाला व गुटख्यासह नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी याबाबत माहिती दिली.
निलेश चंद्रकांत मेहत्रे (वय 28 रा. सासवड जि. पुणे) व निखिल मनोज पोद्दार (वय 25 रा. सासवड जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही कर्नाटकमधून पुण्याला पानमसाला व गुटखा घेऊन जात होते. दोघा जणांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कारवाईत नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त -
कर्नाटकातील चडचण येथून दोन व्यक्ती पुणे येथे पानमसाला व गुटखा घेऊन जात असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पंढरपूर शहरातील सरगम चौक येथे सापळा रचून एका आलीशान गाडीची तपासणी केली असता, त्यात पानमसाला व गुटखा आढळला. या मालाची किंमत दोन लाख रुपये आहे तर, आलिशान गाडीची किंमत सात लाख रुपये आहे. असा एकूण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुटखा विक्री प्रकरणी राज्य सरकार व पोलिसांना उच्च न्यायालयाची नोटीस -
राज्यात गुटखा आणि पान मसाला विक्री बंदी कायदा अस्तित्वात आहे. तरीदेखील अनेक ठिकाणी या पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. याबाबत राज्य सरकार आणि पोलीस विभागाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणी दरम्यान ही नोटीस बजावण्यात आली