सोलापूर - अवैध वाळू वाहतुकीमध्ये वॉच ठेऊन वाळू पोहोच करणाऱ्या दोघांना मंद्रुप पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच आणखीन चार संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई शुक्रवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे. टेम्पो व वाळू सहित साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
वाळू उपसा बंद असताना देखील अवैध वाळू उपसा सुरूच आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एसपी तेजस्वी सातपुते यांनी विशेष पथक निर्माण केले आहे. पण वाळू माफियांनी चोरटी वाळू वाहतूक व वाळू उपसा सुरूच ठेवला आहे.
चोरट्या वाळू वाहतुकीवर वाळू माफियांनी वॉचर नेमले आहेत. वॉचर म्हणजे वाळू पोहोच देताना रस्त्यावर नजर ठेवत पोलिसाना चकवा देत वाहने पास करणे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना दोन संशयित व्यक्ती दुचाकीवरून फिरत होते. पोलिसांना संशय येताच त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी अवैध वाळू वाहतुकीमध्ये वॉचरचे काम करत आहोत, अशी माहिती दिली.
आरोपींची नावे -
श्रीशैल उंबरजे (वय 29 रा नांदणी, ता दक्षिण सोलापूर), अमोघसिद्ध व्हनकोरे (वय 22, रा. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर) या दोन वॉचरना अटक केली आहे. तर गणेश कोळी (रा मंद्रुप), श्रीकांत म्हेत्रे, सिराज अत्तार, कटप्पा काळे (सर्व रा मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर) यावर मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हे चौघे संशयित आरोपी भीमा नदी पात्रातून चोरीने वाळू उपसा करतात. अशी नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.
भीमा नदीच्या पात्रातून कारकल येथून उपसा -
वाळू ठेके किंवा वाळू उपसा पॉईंटचे अद्याप देखील लिलाव झाले नाहीत. हे वाळू माफिया वेगवेगळ्या पॉईंटवरून वाळू उपसा करत असल्याची माहिती समोर आली आहे. भीमा नदीच्या पात्रात व कर्नाटक जवळ असलेल्या कारकल येथील वाळू पॉईंटवरून अवैध वाळू उपसा करत होते.