पंढरपूर - पंढरपूर शहरात गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोन जणांच्या मुसक्या आवळल्या आहे. पंढरपूर गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अजय बाळकृष्ण खाडे व गणेश रमेश शिंदे (रा. संत पेठ पंढरपूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.
पंढरपूर शहरातील दोन वेग-वेगळ्या भागात दोघेजण कमरेला गावठी बनावट पिस्तूल लावून उभी असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या पथकाने या दोघांचीही झडती घेतली. त्यांना दोन बनावटी गावठी पिस्तूल आढळून आले. त्यानंतर सदर पथकाने दोघांनाही जेरबंद केले. आरोपी कोणत्या उद्देशाने पिस्तूल घेऊन फिरत होते याचा तपास पोलीस करत आहे.