सोलापूर - पंढरपूरसह ५ तालुक्यांत 13 ऑगस्टपासून संचारबंदीचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या संचारबंदीचा विरोध करण्याचा निर्णय व्यापारी महासंघाकडून घेण्यात आला आहे. व्यापारी महासंघाची काल पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. त्यानंतर बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनीही व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
हेही वाचा - रोजगार हमी योजनेला गणपत देशमुख यांचे नाव द्यावे : गृहराज्यमंत्री देसाई
पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध कठोर करण्यासाठी पंढरपूरसह माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला या तालुक्यांमध्ये 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूर व माळशिरस तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे. पंढरपूर शहर व्यापारी महासंघाने या संचारबंदीला तीव्र विरोध दर्शवला आहे. संचारबंदीविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यजित मोहोळकर यांनी दिली.
व्यापारी महासंघाकडून होणार आंदोलन
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पंढरपूरसह काही तालुक्यांमध्ये संचारबंदीमध्ये बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे, येथील स्थानिक व्यापारी हा आर्थिक दृष्ट्या जेरीस आला आहे. आता संचारबंदीचा आदेश काढण्यात आल्याने हातावरील पोट असलेल्या व्यावसायिक व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे, 11 ऑगस्ट रोजी व्यापारी महासंघाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला जाणार आहे. 12 ऑगस्ट रोजी येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 13 ऑगस्ट रोजी पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी आपली दुकाने उघडी ठेवणार आहेत.
हेही वाचा - पैशासाठी मित्रानेच केले अपहरण, ऑनलाइन पैसे पाठवून पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या